पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे उभारण्यात येत असलेल्या एक हजार १९० सदनिकांसाठी महापालिकेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून नऊ महिने उलटूनही सोडत काढली नाही. ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने तीन हजार ३०० जणांनी अर्ज केले आहेत. मात्र, सोडतीला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डुडुळगाव येथे एक हजार १९० सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यासाठी शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून ऑगस्ट २०२४ मध्ये ऑनलाइन अर्ज मागविले. अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी तीन हजार ३०० जणांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत; मात्र नऊ महिने होऊनही सोडत प्रक्रिया झाली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डुडुळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी शासन आणि लाभार्थी यांची भागीदारी आहे. सदनिकांची किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये आहे. यामध्ये केंद्र शासन प्रतिसदनिका दीड लाख रुपये तर राज्य शासन प्रतिसदनिका एक लाख रुपये अनुदान देणार आहे. लाभार्थ्याला प्रतिसदनिका १४ लाख १४ हजार १७३ रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे.
सदनिकांची विभागणी आरक्षणानुसार करण्यात आली आहे. त्यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी ५९५, अनुसूचित जातीसाठी १५५, अनुसूचित जमातीसाठी ८३ आणि इतर मागास प्रवर्गासाठी ३५७ सदनिका राखीव आहेत. अपंगांसाठी पाच टक्के आरक्षण आहे. ऑनलाइन अर्जासोबत दहा हजार रुपये अनामत रक्कम आणि ५०० रुपये नोंदणी शुल्क असे एकूण १० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले आहेत. सोडतीमध्ये विजेता न झालेल्या आणि प्रतीक्षा यादीत नाव न आलेल्यांना अनामत रक्कम अर्जावर नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाइन पाठविण्यात येणार आहे.
डुडुळगाव येथील एक हजार १९० सदनिकांसाठी तीन हजार ३०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची छाननी झाली आहे. लवकरच संगणकीय सोडत काढली जाईल, असे महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.
डुडुळगावातील प्रकल्पात १५ मजल्यांच्या पाच इमारती आहेत. तीन इमारतींचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले आहे. चौथ्या इमारतीचे दोन मजले झाले आहेत. सोबतच अंतर्गत कामेही सुरू आहेत. कामासाठी डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत होती. त्याला ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, असे कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांनी सांगितले.