लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताथवडे येथील वळूमाता केंद्र येथील २० हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर गुरुवारी ( १० ऑक्टोबर) जागा देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

राज्य सरकारने १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाला मंजुरी दिली. त्यावेळी चिंचवड येथे महापालिका शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. निगडी येथील शाळेत मुख्यालय थाटण्यात आले. मोशी येथील नऊ एकर जागा आयुक्तालयासाठी मिळाली. मात्र, मुख्यालयासाठी जागेची मागणी कायम होती. सहा वर्षापासून राज्य शासनाकडे पोलीस आयुक्त कार्यालय, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसाठी निवासस्थाने, मुख्यालय, इतर अनुषगिक कार्यालये यांना स्वतंत्र जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. पोलीस आयुक्त चौबे यांनी वेळोवेळी प्रस्ताव सादर करत मागणी लावून धरली.

आणखी वाचा-पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेला आता लागणार आर्थिक शिस्त

पोलीस मुख्यालयासाठी गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. राज्याच्या पशुसंवर्धन व विकास विभागाचे ताथवडे येथे वळूमाता केंद्र प्रक्षेत्र आहे. या केंद्रातील २० हेक्टर जागा शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पोलीस आयुक्तालयाने प्रस्तावित केली. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. पिंपरी – चिंचवड पोलिस मुख्यालयाच्या जागेसाठी आयुक्तालय प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आयुक्त विनयकुमार चौबे तसेच तत्कालीन पोलिस आयुक्तांनीही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे श्वान पथक, देहू येथे पोलिसांचे विश्रामगृह, आयुक्तालय प्रशासकीय इमारतीसाठी मोशी येथे नऊ एकर जागा, पोलीस अधिकारी निवासस्थानासाठी कस्पटेवस्ती येथे १५ एकर जागा, तसेच पोलीस मुख्यालयासाठीही २० हेक्टर जागा मिळाली.

मुख्यालयात होणार १५ विभाग

पोलीस उपायुक्त मुख्यालय कार्यालय, पोलीस परेड मैदान, पोलीस भरती मैदान, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, क्युआरटीसाठी कार्यालय, पोलीस शस्त्रागार, पोलीस रुग्णालय, धावपट्टी मार्ग (रनिंग ट्रॅक) व आवश्यक क्रीडा सरावाची साधने, बॉम्ब शोधक नाशक पथक इमारत, पोलीस पाल्यासाठी शाळा, आंतरराष्ट्रीय शुटींग रेंज, पोलीस वसाहत, बहुउद्देशीय हॉल, बंदोबस्तावरील पोलिसांचे विश्रामस्थान आणि इतर अनुषंगिक कार्यालये येथे होणार आहेत.

आणखी वाचा-जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः उचलून ठेवतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक बाबींचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात आयुक्तालय व मुख्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या विविध विभागांना हक्काची जागा मिळणार आहे, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.