पुणे : मधमाशी संवर्धन आणि जागृतीसाठी कार्यरत अमित गोडसे या पुण्यातील तरुणाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी घेतली. पंतप्रधानांनी अमितच्या कामाबाबत माहिती देऊन त्याच्या कामाची प्रशंसा केली.
मूळचे अभियंता असलेले अमित गोडसे यांनी सॅाफ्टवेअर कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून मधमाशी संवर्धनाचे काम हाती घेतले. पर्यावरणातील मधमाश्यांचे अस्तित्व टिकून राहावे, मधमाश्यांचे महत्त्व कळावे यासाठी अमित गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. मधमाशी संवर्धनासाठी अमित यांनी शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतले. मधमाश्यांना न मारता पोळे आणि मध काढण्याचे काम अमित करतात. तसेच, मधमाशी संवर्धनासाठी ‘बी फ्रेंड्स’ (मधमाशी मित्र) जोडत ‘बी बास्केट’ ही संस्था त्यांनी उभी केली आहे. अमित यांच्या या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून घेतल्याचा आनंद अमित यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘खादी ग्रामोद्योगचे रवींद्र साठे यांचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला. त्यांनी माझी माहिती मागितली. त्यानुसार मी त्यांना पाठवून दिली. मात्र, ती कशासाठी होती याची मला कल्पना नव्हती. पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये बोलणार असल्याचे शनिवारी कळले होते. मात्र, त्याची खात्री वाटत नव्हती. अखेरीस रविवारी झालेल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी माझ्या कामाविषयी माहिती दिली. माझे काम थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचले याचा खूप आनंद आहे.’
कोट आतापर्यंत मी माझे काम करत राहिलो. त्यातून मधमाश्यांच्या संवर्धनासाठी पुण्यात आता अनेक बी फ्रेंड्स (मधमाशी मित्र) तयार झाले आहेत. असे ‘बी फ्रेंड्स’ गावोगावी तयार होण्याची गरज आहे. – अमित गोडसे