पुणे : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कामे होत नसल्याने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने आता ही कार्यालये अधिक सक्षम करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांची किरकोळ कामेही फारशी होत नसल्याने मुख्य इमारतीमध्ये नागरिक येत असल्याबद्दल आयुक्तांनी जाहीर नाराजी नुकतीच व्यक्त केली होती.
नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निवारण स्थानिक पातळीवर करता यावे, यासाठी महापालिकेचे अनेक अधिकार क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याचा वापर नेमका किती होतो, याची ठोस माहिती प्रशासनाकडे नाही. आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवणारी यंत्रणा पुरेशी नसल्याची त्रुटी समोर आल्याचेही सांगितले होते.
महापालिकेची शहरातील विविध भागांत १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. सहायक आयुक्तांवर त्याची जबाबदारी दिली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर महापालिकेने आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, बिगारी, अतिक्रमण निरीक्षक, पाणी पुरवठा विभागातील अभियंते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पावसाळी वाहिन्या, सांडपाणी वाहिन्या तसेच ड्रेनेज लाईन तुंबणे या समस्यांची तक्रार क्षेत्रीय कार्यालयात करता येते. रस्त्यांवरील अतिक्रमण, बेकायदा पद्धतीने लावले जाणारे जाहिरात फलक, कचरा न उचलणे, मिळकतकरात दुरुस्ती यासह अनेक महत्त्वाची कामे क्षेत्रीय कार्यालयांमधून केली जातात.
महापालिकेचे मिळकत कर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी याबाबत आपले अनुभव सांगितले. २००८ ते २०२० या काळात महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये त्यांनी सहायक आयुक्त म्हणून काम केले आहे. ते म्हणाले, ‘दररोज सर्वसाधारण विविध प्रकारच्या २५ ते ३० तक्रारी क्षेत्रीय कार्यालयांकडे येत असतात. त्याची दखल घेऊन त्या सोडविल्या गेल्यास या तक्रारी तेथेच निकाली निघतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावरील कर्मचारी, अधिकारी तक्रारींची दखलच घेत नसल्याने नागरिक त्यांच्या तक्रारी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात घेऊन येतात.’
मिळकतकर विभागात उपायुक्त म्हणून काम करताना मोठ्या संख्येने नागरिक भेटण्यासाठी येत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘या नागरिकांना येत असलेल्या समस्यांचे निवारण क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होत नसल्याने मुख्य कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार दिली जाते. ही तक्रार पुन्हा संबधित क्षेत्रीय कार्यालयांकडेच पाठवावी लागते. मिळकतकर विभागाशी संबधित नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सर्व पेठ निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत. क्षेत्रीय पातळीवरील प्रश्नासाठी नागरिकांना मुख्य इमारतीमध्ये यावे लागल्यास संबधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात येणार आहे.’
किरकोळ कारणांसाठी नागरिकांना महापालिकेच्या मुख्य इमारतीत हेलपाटे मारावे लागत असल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. क्षेत्रीय कार्यालये कमकुवत झाली असून, त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका.
क्षेत्रीय कार्यालयांमधील कामे
- कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देणे
- रस्ते, गटारे, सार्वजनिक जागांमध्ये विकासकामांचे नियोजन करणे
- मालमत्ता कर, व्यवसाय कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
- जन्म, मृत्यू, विवाहाचे दाखले देणे
- विविध प्रकारचे परवाने देणे, तक्रार निवारण केंद्र सुरू करणे
- शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी कचरा व्यवस्थापन, आरोग्य तपासणी
- बेकायदा जाहिरात फलक, बांधकामे यावर नियंत्रण ठेवणे