पुणे : कोंढवा खुर्द परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (१२ सप्टेंबर) महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या विशेष पथकाने या परिसरातील शिवनेरीनगर, गल्ली क्रमांक १ येथे उभारण्यात आलेल्या पाच मजल्यांच्या दोन इमारतींसह सुमारे १५ हजार चौरस फूट आरसीसी बांधकाम जमीनदोस्त केले.
शहरातील विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई सुरू आहे. कोंढवा खुर्द भागात देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहे. बांधकामे करताना पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. येथील सदनिका या मोठ्या रक्कमेत विकल्या जात असल्याने नागरिकांची मोठी फसवणूक होत आहे.
या बाबतच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोंढवा येथील अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेने ही कारवाई थांबविली होती. मात्र, आता पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेल्या इमारतींचा वापर किंवा वास्तव्य करू नये. तसेच या सदनिका खरेदी करू नयेत, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेने कोंढवा परिसरातील अनधिकृत २० इमारतींना नोटीस बजाविल्या आहेत. या सर्व इमारती पाडण्यात येणार आहेत. नागरिकांनी या इमारतींमधील सदनिका खरेदी करू नयेत. – राजेश बनकर, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग.