पुणे महापालिका निवडणुकीचा आखाडा तापला असून दिग्गज नेत्यांच्या सभांनी शहर दणाणलं आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज दुपारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार होती. भाजपने सभेचे नियोजनही केले. या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. पण मुख्यमंत्र्यांची सभा असूनही सभेतील खुर्च्या रिकाम्याच होत्या. मुख्यमंत्री सभेच्या ठिकाणी २.१५ वाजता आले. पण मैदानातील कार्यकर्त्यांची संख्या आणि रिकाम्या खुर्च्या बघून ते लगेच माघारी फिरले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नियोजनाअभावी सभा रद्द करत असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले आणि पिंपरीत होणाऱ्या प्रचारसभेसाठी ते गेले आहेत. पुण्यातील सभेला कार्यकर्त्यांची गर्दी झाली नसली तरी, पिंपरीत होणाऱ्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

I have cancelled my public meeting at Pune due to miscommunication of time of rally. I regret for the same. Heading towards Pimpri Chinchwad
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 18, 2017
मुंबई, पिंपरीसह पुणे महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेली ही महापालिका काबीज करायचीच, असा चंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने बांधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी पुण्यातच ठाण मांडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी २ वाजता पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर प्रचार सभा होणार होती. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या सभेचे नियोजनही केले होते. सभेच्या ठिकाणी हजारो खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. मैदानाभोवती बॅनरही लावले होते. या प्रचारसभेतून मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार असल्याने कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने या सभेला येतील, अशी अपेक्षा होती. पण सभेची वेळ झाली तरी, मैदानातील खुर्च्या रिकाम्याच होत्या. या सभेला मोजून शंभराच्या आसपास कार्यकर्ते आले होते. मुख्यमंत्री दुपारी सव्वादोनच्या सुमारास सभेच्या ठिकाणी आले. सभेतील मांडलेल्या खुर्च्या रिकाम्या पाहून नेत्यांसह ते माघारी फिरले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आदी नेते होते. मुख्यमंत्र्यांनी सभेच्या ठिकाणी काही वेळ वाट पाहिली. मात्र, सभेला कार्यकर्ते जमले नाहीत. अखेर कार्यकर्त्यांनी मैदानातील मागील बाजुच्या खुर्च्या हटवायला सुरूवात केली. अखेर काही वेळाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले. मी पुण्यातील प्रचार सभा रद्द करत आहे. नियोजनाअभावी ही सभा रद्द करावी लागत असून, मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यानंतर पिंपरीत होणाऱ्या सभेसाठी ते रवाना झाले. दरम्यान, पुण्यातील सभेला गर्दी जमली नसली तरी, पिंपरीत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला तुफान गर्दी जमली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी वातावरण निर्माण करू शकलो नाही. त्याचा कोणताही परिणाम निवडणुकीवर होणार नाही. काही तास शिल्लक राहिले असून, कार्यकर्ते पक्षाचे ध्येय-धोरणे मतदारांपर्यंत पोहचवणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.