महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्य़ात कोरडा दिवस (ड्राय डे) जाहीर करण्यात आला आहे. येत्या सोमवारी (२० फेब्रुवारी), मतदानाच्या दिवशी (२१ फेब्रुवारी) आणि मतमोजणीच्या दिवशी (२३ फेब्रुवारी) संपूर्ण पुणे जिल्हयातील मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
निवडणुक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने तीन दिवस कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्य़ातील मद्यविक्री करणारी दुकाने आणि परमिट रूमचालकांना मद्यविक्री बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे,अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद तसेच तेरा पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान येत्या मंगळवारी (२१ फेब्रुवारी) होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यादिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अवैध मद्यनिर्मिती, विक्री तसेच मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या तक्रारी आल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
देशी, विदेशी मद्याची विक्री करणारी दुकाने, ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणी मद्याचा साठा करत असेल तर त्याची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेल्या चित्रीक रणातून उपलब्ध होईल. बनावट मद्याविक्री, अवैध दारूधंद्यावर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गस्त घालण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके पुणे शहर तसेच जिल्हयात रात्री गस्त घालणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क विभागाकडून ३४६ गुन्हे दाखल
आचारसंहिता लागू झाल्यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडून ३४६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ांमध्ये १९६ आरोपींना अटक क रण्यात आली आहे. या कालावधीत अवैध दारू निर्मिती करणाऱ्या धंद्यावर छापे टाकण्यात आले आहेत. २७ वाहने, मद्यनिर्मितीसाठी लागणारे रसायन, अन्य साहित्य असा ८९ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.