पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत पुणे तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शैक्षणिक संस्थांसाठी आरक्षित असलेल्या जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांनी केली आहे.
‘कॅन्टोन्मेंट भागाचे विलीनीकरण पुणे महापालिकेत होत आहे. ही चांगली बाब आहे. दिवसेंदिवस शहराचा आणि शाळांच्या विस्तार होत आहे. शाळांसाठी जागा कमी पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत आधुनिक शिक्षणाची अत्यंत गरज आहे . शिक्षणाचा प्रसार झाला तरच उद्याचे चांगले नागरिक तयार होणार आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट भागातील अनेक वर्षांच्या भाडेकरारावर दिलेल्या जागा महापालिकेने ताब्यात घेणे आवश्यक आहे,’ असे संचेती यांनी सांगितले.
‘पुणे महानगरपालिकेमध्ये या शाळेच्या जागा गेल्यास त्या जागेवर अत्याधुनिक शाळा, वसतिगृह बांधता येणार आहेत. या जागा महापालिकेने ताब्यात न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोकळ्या जागा तशाच कायम राहून त्यावर अनधिकृत बांधकाम होतील. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शाळांच्या जागा महापालिकेने ताब्यात घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.’ असे संचेती यांनी स्पष्ट केले.