उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या गावांतील विकासकामांवर महापालिकेने पाच वर्षांत २५० कोटी रुपये खर्च केले. या गावांचा महापालिकेत समावेश होण्यापूर्वी कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्येवर २००८ पासून २०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, या दोन गावांतून महापालिकेला २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

हेही वाचा >>> वाढीव मिळकत कराच्या ओझ्यामुळे नगरपालिका निर्मितीचा निर्णय; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची स्पष्टोक्ती

उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांनी कचरा डेपोमुळे अनेक वर्षे समस्यांना तोंड दिले आहे. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी नागरिकांनी आंदोलने करून कायदेशीर लढा दिल्याने या गावांमध्ये कचरा टाकणे बंद झाले. या ठिकाणच्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने दोनशे मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रकल्पही सुरू केला. कचरा प्रक्रिया, वृक्ष लागवड अशा विविध कामांसाठी महापालिकेकडून २०६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच या गावांतील नागरिकांना २००८ पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. रस्त्यांचीही कामे करण्यात आली. ही दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. दोन्ही गावांमध्ये राबवल्या जाणाऱ्या नगरनियोजन (टीपी) योजनेच्या कामांसाठी महापालिकेने सातशे कोटींचा निधी उभारणीसाठीचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच सांडपाणी व्यवस्था आणि पावसाळी गटारांच्या कामांचेही नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती महापालिकेच्या विविध विभागांनी दिली.

हेही वाचा >>> पुण्यात दुचाकी चोरांचा उच्छाद ; दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीला

महापालिकेमध्ये गावांचा समावेश केल्यानंतर या दोन्ही गावांतून महापालिकेला दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळकत कराद्वारे, तर बांधकाम विकसन शुल्कापोटी २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मिळकत कर आकारणी विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकाच आवश्यक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली अकरा गावे आणि हवेलीतील उर्वरित भाग एकत्र करून नवीन महापालिका स्थापन करण्याची मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. फुरसुंगी, देवाची उरळी, उरळी कांचन, वडकी, वाघोली, केसनंद, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, लोणीकंद, कात्रजच्या सर्व वाड्या व उंड्री, पिसोळी, वडाची वाडी, औताडवाडी, हांडेवाडी आदी भाग एकत्र करून स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या सर्व भागाचा सुनियोजित विकास होईल. सध्या हा भाग लोकवस्तीने गजबलेला असून, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची गरज आहे. पुणे महापालिकेत हा भाग समाविष्ट केल्याने किंवा यातील केवळ दोन गावे बाजूला काढून, त्यांची स्वतंत्र नगरपालिका करून या भागाचा प्रभावी विकास होऊ शकत नाही. या बाबत गांभीर्याने विचार करून या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, असे शिवरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.