पुणे : ‘शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या ठिकाणांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रॅम्पवर योग्य पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या रॅम्पचे इंदूरच्या धर्तीवर यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. तसेच, कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने केली जाणार आहे,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

शहरात कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेने सात रॅम्प उभारले आहेत. त्यांची अवस्था दयनीय झाल्याने कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कचऱ्याचे वाटप करण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाणार आहे.

शहरात अनेक विकास प्रकल्प राबवण्यासाठी जागतिक बँकेची मदत घेतली जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण करणार आहेत. या माध्यमातून विविध प्रकल्पांसाठी निधी मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. याबाबत अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘शहरातील कचरा रॅम्पची अवस्था बिकट आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. योग्य पद्धतीने वर्गीकरण या ठिकाणी होत नाही, तसेच निर्जंतुकीकरणाचीदेखील समस्या गंभीर आहे. यामुळे येत्या काळात या कचरा रॅम्पच्या आधुनिकरणावर भर देण्यात येणार असून यासाठी या रॅम्पचे यांत्रिकीकरण केले जाणार आहे.’

‘शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच त्याच्या पुनर्वापराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्योग, सरकारी संस्था या मार्फत करता येणे शक्य असून, त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जागतिक बँकेकडून जो निधी उपलब्ध होईल त्यामधून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील. शहरात ज्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची बांधणी सुरू आहे, ते पूर्ण होण्यास मार्च २०२६ चा कालावधी लागणार आहे. यानंतर ही समस्या दूर होईल,’ असा विश्वास आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने होत नाही त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी कचरा रॅम्पच्या आधुनिकरणावर भर देण्यात येणार आहे.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कचऱ्यासाठी ५० कोटींचा निधी स्वतंत्र’ ‘कचऱ्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार आहेत. यासाठी निधी लागणार आहे. त्यामुळे यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी हा वेगळा ठेवला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून तातडीची कामे केली जाणार आहेत,’ अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.