पुणे : हडपसर येथील प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळण्यासाठी हडपसर गाडीतळ – मगरपट्टा ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक अशी पूरक सेवा (फीडर) ‘पीएमपी’ने सुरू केली. त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणीनगर मेट्रो स्थानकांपर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी आणि प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्या समन्वयाने नियोजन करण्यात येत आहे. हडपसर गाडीतळ-मगरपट्टा ते कल्याणीनगर या मार्गावरील बससेवेचा पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे आणि महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र सनेर पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

या मार्गावर २८ फेऱ्या होणार असून, दर ४५ मिनिटांनी बस सोडण्याचे निश्चित केले आहे. हडपसर, गाडीतळ, मगरपट्टा दवाखाना, मेगा सिटी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, कीर्तने बाग, मुंढवा गाव, कचरेवस्ती, कल्याणीनगर पूल ते कल्याणीनगर बस स्थानक या मार्गिकेनुसार बस धावणार आहे. महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरण प्रकल्पात खराडी ते हडपसर या मार्गिकेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. हडपसर, मगरपट्टा या परिसरातील स्थानिकांना स्वारगेट, पिंपरी-चिंचवड किंवा शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या परिसरात जाण्यासाठी ‘पीएमपी’वर अवलंबून राहावे लागत आहे. मगरपट्टा परिसरात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या असल्याने नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात सतत वाहतूककोंडी असते. याबाबत स्थानिकांकडून महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. त्यानुसार हडपसर, मगरपट्टा परिसरातील स्थानिकांसाठी कल्याणीनगर मेट्रो स्थानक जवळ असल्याने या मार्गिकेवर बससेवा सुरू करण्यात आल्याचे पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुंडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील ज्या भागात मेट्रो मार्गिका नाहीत; पण पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत मेट्रो स्थानक आहे, अशा ठिकाणी ‘पीएमपी’ आणि महामेट्रोच्या समन्वयाने पूरक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दोन्ही विभागांकडून अशा मार्गांचा अभ्यास करण्यात येत आहे. लवकरच अन्य ठिकाणीही पूरक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. – दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल