पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापून नेण्याचा प्रयत्न करणारी महिला पकडली गेली. झटापटीत चोरट्याने महिलेने कटरने प्रवासी महिलेच्या हातावर वार करून पसार होण्याचा प्रयत्न केला. प्रवासी महिलेच्या तत्परतेमुळे दागिने चोरणारी महिला पकडली गेली.
या प्रकरणी अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास महापालिका ते वसंत चित्रपटगृह दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत आरोपी भोसले हिने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. तिने आरडाओरडा केला.
भोसलेने धावत्या बसमधून उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झटापटीत तिने तक्रारदार महिलेच्या हातावर कटरने वार केला. महिलेच्या हाताला दुखापत झाली. अशा परिस्थितीत तक्ररदार महिलेसह अन्य प्रवाशांनी भाेसलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भोसलेला अटक करण्यात आली आहे. तिने पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करत आहेत.
रोगनिदान केंद्रात तपासणी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरी
रोगनिदना केंद्रात तपासणीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ४५ हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्या १४ नोव्हेंबर रोजी मंगळवार पेठेतील एका खासगी रोगनिदान केंद्रात (डायग्नोसिस सेंटर) तपासणीसाठी आल्या हाेत्या. तपासणीसाठी आल्यनंतर त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोकड पिशवीत ठेवली. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. तपासणी करुन आल्याननंतर पिशवी चोरुन नेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मनीषा पुकाळे तपास करत आहेत.
दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरी
कोथरूड भागातील एका मंदिरातील दानपेटी उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील उजवी भुसारी काॅलनीत संकल्प सिद्धी हनुमान मंदिर आहे. रविवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरटे मंदिरात शिरले. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील दोन लाख रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंभार तपास करत आहेत.
