पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे दोन आठवड्यांत ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढले असले, तरी सरासरीच्या तुलनेत प्रवासी संख्येत घट झाली असल्याचे समोर आले आहे. भाडेवाढ केल्यापासून दोन आठवड्यांत सरासरी १५ हजारांहून अधिक प्रवासी घटले आहेत.मे महिन्यात पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी दहा लाख १४ हजार ७९३ असून, दिवसभराचे सरासरी उत्पन्न एक कोटी ४२ लाख २९ हजार ६६४ रुपये होते. एक जूनपासून भाडेवाढ केल्यानंतर १५ जूनपर्यंत पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी नऊ लाख ९९ हजार ८३० पर्यंत आली. दोन आठवड्यांत सरासरी दोन कोटी ११ लाख ८५ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांच्या हद्दीतील विविध ३९२ मार्गांवरून धावणाऱ्या ‘पीएमपी’ची एक जूनपासून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली. ही भाडेवाढ पाच टप्प्यांत करण्यात आली.पीएमपी प्रवासी मंचाचे संजय शितोळे म्हणाले, ‘‘पीएमपी प्रशासनाकडे अचूक प्रवासी संख्या मोजण्याचे साधन नाही. पीएमपी प्रशासनाने भाडेवाढ करण्यापूर्वी सेवा नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, ते झाल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी पाच किलोमीटर अंतराच्या आतील प्रवासासाठीही वीस रुपये भाडे आकारले जात आहे. पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.’

‘पीएमपी’ प्रशासनात भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांना सुलभ सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर कार्यवाही करण्यात येत आहे. महिला प्रवाशांसाठी अनेक मार्गांवर विशेष बस सेवा, सुरक्षिततेसाठी पोलिसांची मदत आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएमपीची प्रवासी संख्या कायम आहे. बस कमी पडत असल्याने काहीसा परिणाम जाणवतो आहे. मात्र, ताफ्यात नवीन बस दाखल होताच प्रवासी संख्या वाढेल.सतीश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक, संचालन विभाग, पीएमपीएमएल

पीएमपीचे प्रति दिवस सरासरी उत्पन्न आणि प्रवासी

महिना – सरासरी उत्पन्न – सरासरी प्रवासी

मे – १,४२,२९,६६४ – १०,१४,७९३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ जूनपर्यंत – २,११,८५,०६४ – ९,९९,८३०