पुणे : कार्तिकी एकादशी आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस उपलब्ध करून दिल्या आहेत. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मार्गावरील १३३ आणि जादा २२९ अशा एकूण ३६२ बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
१५ ते १७ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी रात्री बससेवा गरजेनुसार चालवली जाईल, तर इतर दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत सेवा राहील. भाविकांच्या सोयीसाठी आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक काटेवस्ती येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, या विशेष सेवेंतर्गत रात्री १० वाजल्यानंतर १० रुपये जादा प्रवासी तिकीट आकारण्यात येणार आहे. तसेच, एका दिवसाचा, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पासधारकांनाही त्यांचे पास रात्री १०नंतर वापरता येणार नाहीत.
यात्राकाळात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पीएमपीने शहरातील विविध भागांतून आळंदीला जाणाऱ्या बस वाढवल्या आहेत. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी आणि रहाटणी या १० स्थानकांवरून जादा बससेवा उपलब्ध असेल. या सर्व ठिकाणांहून १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान रात्री सेवा उपलब्ध असेल. १३, १४ आणि १८ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत बस धावतील.
यात्रा काळात गर्दीमुळे अनेक मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. काही बस मार्गिकांच्या मुख्य स्थानकांच्या संचलनाचे मुख्य स्थानकांमध्येही स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक आणि प्रवाशांनी या बदलांना सहकार्य करावे,असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले.
हे मार्ग बंद राहणार
यात्रेसाठी जादा बस उपलब्ध करण्यासाठी शहरातील काही नियमित बस मार्गांवरून बस कमी करून या विशेष सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. परिणामी, आळंदी बसस्थानकावरून संचालित होणारे मार्ग क्रमांक २६४ (भोसरी ते पाबळ), २५७ (आळंदी ते मरकळ) आणि ३६४ (आळंदी ते चाकण आंबेठाण चौक) हे तीन मार्ग यात्राकाळात बंद राहतील.
पीएमपीने आळंदी यात्रेतील गर्दीमुळे या मार्गावर जादा पीएमपी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत ही सेवा सुरू असल्याने मनुष्यबळ, इतर मार्गांवरील मिळकतीचे नियोजन आणि त्यानुसार नियोजन या दृष्टीने रात्री दहानंतर १० रुपये जादा शुल्क आकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जादा बससाठी नेहमीच जादा शुल्क आकारले जाते. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
