पुणे : पीएमपी वाहक महिलेला शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धीरज रामचंद्र ब्रिजवासी (वय ३२, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीएमपी वाहक महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातून पीएमपी बस सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निघाली होती. त्यावेळी आरोपी ब्रिजवासीने धावत्या बसमध्ये प्रवेश केला. पीएमपी वाहक महिलेने त्याला ‘धावत्या बसमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. जीवावर बेतू शकते’, असे सांगितले. ब्रिजवासीने वाहक महिलेशी प्रवाशांसमोर बसमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. वाहक महिलेला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पीएमपी बस चालकाने बस कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नेली. ब्रिजवासीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला नोटीस बजाविली आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.
पाेलीस शिपायाला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
पोलीस शिपायाला शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी हडपसर पोेलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मधुकर सरदारसिंग ठेंग-देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई कृष्णा घोळवे (वय २५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘काॅप्स २४’ हे पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस शिपाई घाेळवे या पथकात नियुक्तीस आहेत. हडपसर भागातील एका मद्य विक्री दुकानासमोर सोमवारी मध्यरात्री वादावादीची घटना घडली होती. त्यानंतर ठेंग-देशमुख याने पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. गस्त घालणारे पोलीस शिपाई घोळवे तेथे पाेहोचले. तेव्हा घोळवे यांनी त्याला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने घोळवे यांच्याशी वाद घातला. ‘तू मला ओळखत नाही का ? पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला का सांगतो’, असे सांगून धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आाणल्या प्रकरणी देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नोटीस बजाविली आहे. पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक तपास करत आहेत.