पुणे : स्वारगेट येथील पीएमपी आगारात बसला अचानक आग लागली. पीएमपी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. स्वारगेट पीएमपी आगारात शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर आल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले.
हेही वाचा >>> लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
या घटनेची माहिती त्यांनी अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवान घटनास्थळी पाेहचेपर्यंत आगारीतल पीएमपी कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणाचा (फायर एक्स्टिंग्युशर) वापर करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाकडून पीएमपी आगारातील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणाचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांनी त्वरीत उपकरणाचा वापर करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक अतुल मोहिते, जवान चंद्रकांत गावडे, आजीम शेख, सागर ठोंबरे, मयूर ठुबे, तुषार जानकर यांनी ही कामगिरी केली.