पिंपरी-चिंचवड : शहरातील बीआरटी मार्गासह अनेक ठिकाणी पीएमपीच्या बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. थांबे तुटले असून थांब्याजवळ कचऱ्याचे ढीग साचले आहे. काही ठिकाणी थांबेच नाहीत. जेथे आहेत, त्यावर छप्पर नाही, बसायला बाके नाहीत किंवा तुटलेली आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस धावतात. शहरातील बीआरटीच्या ९२ थांब्यांसह इतर मार्गांवरील बस थांब्यांची अवस्था फारच बिकटआहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीचे तेराशेहून अधिक थांबे आहेत. अनेक ठिकाणी केवळ थांब्याच्या पाट्या आहेत. तळेगाव दाभाडे, वडगाव, मावळ, देहूरोड या भागांतही हीच अवस्था आहे. पीएमपीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून स्टीलचे बस थांबे उभारले आहेत. या सांगड्याचे भाग गायब होत आहेत. सांगाडे तोडून नेले जात आहेत.
निगडीतून सर्व मार्गांवर पीएमपीच्या बस सुटतात. येथील टिळक चौकात एकही थांबा नाही. बाजूलाच महामेट्रोच्या कामासाठी खोदाई केली आहे. त्यामुळे स्थानकही अरुंद झाले आहे. या कामासाठी थांबे काढले आहेत. त्यामुळे नागरिकांना पावसातच बसची वाट पाहत थांबावे लागते. निगडीहून पिंपरीकडे येणाऱ्या बीआरटी मार्गावरील निगडी, बजाज ऑटो, आकुर्डी हे थांबे मेट्रोच्या कामासाठी पाडले आहेत. त्यामुळे नागरिकांना सेवा रस्त्यावर बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. पिंपरीहून निगडीकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गावरील बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रात्री वीजपुरवठाही नसतो. सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे महिला प्रवाशांना जीव मुठीत धरून थांब्यावर बसची प्रतीक्षा करित थांबावे लागते.
पिंपळे निलख ते वाकड परिसरातील बीआरटी थांब्यांचीही दुरवस्था आहे. बीआरटी स्थानकावर कचरा होऊ नये, यासाठी कचराकुंड्या उभारण्यात आल्या आहेत. त्या ओसंडून वाहत आहेत. त्याकडे आरोग्य विभागाचे लक्ष नाही. बस थांब्याच्या दर्शनी भागात पाणी साचते. तेथे गवत उगवले असून, त्यामुळे बस थांब्यात प्रवेश करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो.
प्रवेशद्वारावरील कचऱ्याचे ढीग, कचरापेटीबाहेर आलेला कचरा यामुळे स्थानक परिसरात दुर्गंधी पसरते. ये-जा करण्याच्या मार्गावर पाणी साचून शेवाळे तयार झाले आहे. त्यामुळे घसरून पडण्याची भीती आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करणारे माहिती कक्ष धूळखात पडून आहेत. त्याची दुरुस्ती, स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे ते केवळ शोभेपुरते उभे आहेत.
अनेक बीआरटी बस थांब्यांतील दिवे रात्री बंद असतात. अंधारात बसची वाट पाहताना भीती वाटते. सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. प्रशासनाने वीजपुरवठा सुरू करावा. सुरक्षा रक्षक तैनात करावेत. – प्रीती डोके, प्रवासी
अनेक थांब्यांच्या ठिकाणी बसायला जागा नाही. अनेकदा बस उशिरा येते. अर्धा तास थांब्यावर पावसात भिजत उभे रहावे लागते. प्रशासनाने बस थांबे सुस्थितीत आणावेत. नागरिकांचा त्रास कमी करावा. – दादासाहेब साठे, प्रवासी
बस थांब्यांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती केली जाते. निगडीत मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोने जागा उपलब्ध करून दिल्यास बस थांबा उभारणे शक्य होईल. कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. – दत्तात्रय तुळपुळे, मुख्य अभियंता (स्थापत्य), पीएमपी