पुणे : स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नव्याने तालुकानिहाय नऊ क्षेत्रीय कार्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे नागरी समस्या आणि बांधकाम परवानगीबाबतचे प्रश्न आता संबंधित तालुकानिहाय सुटणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत ९ तालुक्यातील ६९७ गावांचा कारभार चालतो. या गावातील नागरिकांचे प्रश्न तसेच बांधकाम परवानगीबाबतच्या कामकाजासाठी संबंधितांना मुख्य कार्यालय आकुर्डी किंवा औंध या ठिकाणी यावे लागत होते. यामुळे नागरिकांचा अधिक वेळ जात असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ९ तालुक्यात क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आता तालुका कार्यालयातून संबंधित तालुक्याचे कामकाज पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या सभेत या निर्णयाला मान्यता दिली होती. या निर्णयामुळे नागरिकांना आता पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी आणि पुण्यातील औंधमधील कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.
तालुकानिहाय क्षेत्रीय कार्यालयासाठी अपेक्षित मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात अभियंता, सहायक महानगर नियोजनकार, लिपिक, शिपाई आदी मनुष्यबळाचा समावेश असून, पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नऊ तालुक्यांत क्षेत्रीय कार्यालयात कामकाज सुरू झाले आहे. या क्षेत्रीय कार्यालयामुळे पीएमआरडीए हद्दीतील नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि बांधकाम परवानगीबाबतचे काम आता तालुकानिहाय होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कार्यालये कुठे?
चाकण (ता. खेड), तळेगाव (ता. मावळ), वाघोली (ता. हवेली १), औंध (ता. हवेली २), यवत (ता. दौंड), शिक्रापूर (ता. शिरूर), नसरापूर (ता. भोर), सासवड (ता. पुरंदर), चांदे (ता. मुळशी), नसरापूर (ता. वेल्हे) या ठिकाणी ‘पीएमआरडीए’ची तालुका स्तरावरील क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.