पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात ११७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्यात आले.

वाहतूक पोलिसांनी मुंढवा, कोरेगाव पार्क, येरवडा, विमाननगरसह शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी करून ११७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मध्यरात्रीनंतर शहरात होणारे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता अचानक नाकाबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली. वाहतूक पोलीस, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली.

हेही वाचा – Pune Porsche Accident : महागडी पोर्श कार अल्पवयीन आरोपीला वाढदिवसानिमित्त मिळाली होती भेट

हेही वाचा – Pune Accident Case : विशाल अगरवाल यांच्या अडचणींत वाढ, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

वेगवेगळ्या भागात कारवाई करून एक हजार ४०९ वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत ११७ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. येरवडा आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी २६२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी दोन लाख ८४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात शहरात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके या कारवाईत सहभागी झाली होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी ८५ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली होती.