पुणे : गणेश पेठेतील नागझरी नाल्याजवळ मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महापालिकेने तीन मजली इमारत बांधली आहे. इमारत बांधल्यानंतर नागझरी नाल्यात बेकायदा मासे विक्री करण्यात येत होती. आंदेकर टोळीकडून मासे विक्रेत्यांकडून दरमहा हप्ता घेण्यात येत होता. आंदेकर टोळीला मासळी बाजारात हप्तापोटी दरमहा मोठी रक्कम मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मंगळवारी नागझरी नाल्यात मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

मध्यंतरी हप्ता देण्यास नकार दिल्या प्रकरणी एका मासे विक्रेत्याला मारहाण करून खंडणी मागितल्या प्रकरणी बंडू आंदेकरचा पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांना महापालिकेने बांधलेल्या नवीन मासळी बाजारात स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागझरी नाल्याची जागा पाटबंधारे विभागाची आहे. दरम्यान, आयुष कोमकर खून प्रकरणात प्रकरणात पसार झालेला आराेपी कृष्णा आंदेकर मंगळवारी पोलिसांसमोर हजर झाला. कृष्णाला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीचे ठेवण्याचे आदेश दिले. कोमकर खून प्रकरणातील आरोपींना कृष्णाने पिस्तूल दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू्अण्णा आंदेकर याच्यासह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आयुषची आई कल्याणी कोमकर ही बंडू आंदेकरची मुलगी आहे. तिने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पसार झालेले आंदेकर कुटुंबीय आणि साथीदारांना पोलिसांना पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज (वय ४०) हा पसार झाला होता. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. मंगळवारी सकाळी कृष्णा समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर त्याला पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालायत हजर केले.

कृष्णा आंदेकर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे मोबाइल संच मागितला. तेव्हा त्याने मोबाइल संच फोडून फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. मकोका कारवाईची नोटीस घेण्यास त्याने नकार दिला. आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी दोन पिस्तुले जप्त केली आहे. आरोपी अमन पठाण याची दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.