scorecardresearch

कोथरूडमधील गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई, औरंगाबादमधील कारागृहात रवानगी

वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पुण्यात कारवाई करण्यात आली आहे.

arrest
सांकेतिक फोटो

पुणे : वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. ऋषीकेश उर्फ शुभम मधुकर वाघमारे (वय २४, रा. गुजरात काॅलनी, कोथरुड) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. या गुंडाची औरंगाबादमधील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : तडीपार गुंडाला बेड्या, पिस्तुल जप्त; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

वाघमारे विरोधात कोथरुड, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षात त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या दहशतीमुळे नागरिकही तक्रार करत नव्हते. त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता.

ही वाचा >>> कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी, भर रस्त्यात मारहाण; एकास अटक

या प्रस्तावाला पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नुकतीच मंजुरी दिली. वाघमारे याला वर्षभरासाठी ओैरंगाबादमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. शहरात दहशत माजविणाऱ्या ६९ गुंडां विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-06-2022 at 19:04 IST