Devendra Fadnavis Pune visit पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावं,या मागणीसाठी मागील चार दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलनास बसले आहेत.त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा समाजातील नागरिक आझाद मैदानावर ठिय्या देऊन बसले आहेत. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मार्फत अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे ठोस निर्णय घेण्यात आला नाही.यामुळे मराठा समाजातील कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत असून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

तर यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात होऊन सहा दिवस झाले आहे.त्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून अनेक मंडळाना नेतेमंडळी भेट देत आहेत.त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्‍यावर आले असून ते मानाच्या गणपतीचे दर्शन आरती करणार आहेत.तसेच अन्य काही विशेष मंडळींच्या घरी जाणार आहे. सध्याची एकूणच परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार्‍या मार्गावर पुणे पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या खडकवासला येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सिंहगड रोडवरील पुलाच्या उदघाटन कार्यक्रमाला रवाना झाले.याबाबत मराठा समाजातील काही आंदोलनकर्त्यांना माहिती होताच, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे,या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी मराठा समाजातील आंदोलनकर्ते कार्यक्रम स्थळी आले होते.त्यावेळी पुणे पोलिसांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.