प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. वसंत बाबर हे पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील म्हाळुंगे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. २८ वर्षांच्या पुलीस सेवेत बाबर यांना ३५१ बक्षीस तर २३ प्रशस्तीपत्र मिळाली आहेत.
हेही वाचा >>> ‘या’ नव्या अभ्यासक्रमासाठी आता मिळणार श्रेयांक, उच्च शिक्षण विभागाचे आदेश
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात आनंदाचे वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील चोपडी या त्यांच्या मूळ गावी वसंत बाबर यांनी राहुरी विद्यापीठातून एमएससी ऍग्री केली. मग, त्यांनी १९९६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले. ३ जून २०१४ ला पोलीस निरीक्षक पदी बढती झाली. कोल्हापूर, मुंबई, सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि पिंपरी- चिंचवड पोलीस दलात त्यांनी कर्तव्य बजावले आहे. एसीबी, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा याठिकाणी देखील त्यांनी भरीव कामगिरी केली. घरफोडी, दरोडा आणि जबरी चोरीतील गुन्हेगारांना त्यांनी जेरबंद केले आहे. अनेक गुन्ह्यांची उकल करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. २०१४ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आता त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.