पुणे: येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याची माहिती उघडकीस आल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता. त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराइतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्तावर सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी होते. वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली.
बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केले. मारणेच्या व्हॅनबरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली.मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. विशाल धुमाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला.
मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच मारणेला ढाब्यावर भेटणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.