पुणे : काँग्रेसमधील वाढती अंतर्गत गटबाजी, रुसवे आणि फुगव्यांसह आपापसातील मतभेद आगामी लोकसभा निवडणुकीत घातक ठरण्याची शक्यता असल्याने शहर पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले मंगळवारचे स्नेहभोजन रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील मनोमिलन कागदावरच राहणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची आज पुण्यात बैठक
आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये दोन गट असून, त्यांच्यातील वाद, मतभेद सातत्याने पुढे आले आहेत. प्रभारी शहराध्यक्ष यांचा एक गट असून, विद्यमान आमदारांचा दुसरा गट आहे. काँग्रेसमधील गटातटाच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडेही करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटबाजी धोक्याची ठरण्याची शक्यता असल्याने पटोले यांनी ती रोखण्यासाठी पुढाकार घेत स्नेहभोजन आयोजित करण्याची सूचना माजी मंत्री उल्हास पवार यांना करण्यात आली होती. त्यानुसार येत्या मंगळवारी (२३ जानेवारी) आयोजित करण्यात आला होता. मात्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली.