पुणे : कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून भरधाव मोटार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे दोघांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित मुलाने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सज्ञान आरोपीप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सत्र न्यायालयात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> पबच्या संख्येबाबत महापालिकाही अनभिज्ञ, अनधिकृत ‘रूफटॉप’ हॉटेल्सवर कारवाईचे महापालिकेकडून पोलिसांना पत्र

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकारानंतर शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्था या आक्रमक झाल्याने पोलिसांनी भूमिकेत बदल केला आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला १४ दिवस निरीक्षणगृहात ठेवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. मुलगा मद्याप्राशन करून मोटार चालवित असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसून आले आहे. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (भादंवि ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गंभीर असल्याने सज्ञान आरोपीप्रमाणे मुलाविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मतदान प्रक्रियेदरम्यान शिक्षकाचा मृत्यू, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांची नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व कायदेशीर बाबी विचारात घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी किरकोळ कारवाई केली, असे कोणी समजू नये किंवा तसे आरोपही करू नयेत. अपघात प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त