पुणे : महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपचे नेते आणि पदाधिकारी आघाडीवर असून, बैठकीनिमित्त महापालिकेत येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे.

निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने महापालिकेला दिल्या आहेत. ४ ऑगस्टपर्यंत महापालिकेने केलेली प्रभागरचना नगररचना विभागाकडे सादर करण्याची मुदत आहे. प्रभागरचना करताना झुकते माप मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत भाजपचे अधिकाधिक नगरसेवक विजयी कसे होतील, यासाठी भाजप विशेष आग्रही असून, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे यांनी  आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. अडीच ते तीन तास ही चर्चा सुरू होती. शहरातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी ही बैठक घेतल्याचे कारण नेत्यांनी दिले. मंत्री पाटील यांच्या भेटीनंतर माजी सभागृह नेते आणि भाजपकडून महापालिकेच्या निवडणूक नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेल्या गणेश बीडकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

महापालिकेकडून प्रभागरचनेचा आराखडा पुढे जाईपर्यंत राजकीय पक्षांकडून आयुक्तांची गाठभेट घेऊन त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा महापालिकेत रंगत आहे.

भानगिरेंची भेट झालीच नाही…

प्रभागरचना अंतिम होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. मात्र, गुरुवारी आयुक्तांबरोबर त्यांची भेट झालीच नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अडीच ते तीन तास बैठक घेतली. यानंतर भाजपचे पदाधिकारी बीडकर हे अर्धा तास आयुक्तांशी चर्चा करीत होते. त्यानंतर आयुक्त नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यामुळे दुपारपासून महापालिकेत थांबलेल्या भानगिरे यांना आयुक्तांच्या भेटीशिवाय परतावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील विविध भागांत जाऊन कोणती कामे सुरू आहेत, याची पाहणी केली जात आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह हा विकास आघाडीच्या काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी भेट देण्याची विनंती दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यांना वेळ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली.- नवल किशोर राम, महापालिका आयुक्त