प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी
जमिनींना सोन्याचा भाव मिळू लागल्यानंतर सर्वप्रथम ज्या गावचं रूपड बदलले आणि भूमिपुत्रांचे ‘चांगभल’ झाले, त्या िपपळे सौदागर प्रभागात होणाऱ्या लढतीविषयी पंचक्रोशीत उत्कंठा आहे. नातीगोती आणि गावकी-भावकी पाचवीला पुजलेल्या या भागात दोन गटातील टोकाचे मतभेद आणि श्रेयवादाने कळस गाठला आहे. प्रत्येकाकडे रग्गड पैसा खुळखुळत असल्याने कोणी कोणाला जुमानत नाही. ‘मनी’, ‘मसल’ आणि ‘मॅनपॉवर’ची हे येथील निवडणुकीचे वैशिष्टय़ राहणार आहे.
िपपळे सौदागरचा संपूर्ण आणि रहाटणीचा काही भाग मिळून तयार झालेल्या नव्या प्रभागात गावठाण आणि सोसायटय़ा असे संमिश्र स्वरूप आहे. ‘आयटी’ क्षेत्रातील तसेच उच्चभ्रू वर्गाचे या भागात प्राबल्य असून त्यांचीच मते निर्णायक ठरणार आहेत. राजकीय वर्तुळात मात्र, गावकी-भावकीचा प्रभाव आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला गटातील दोन जागा असे प्रभागाचे आरक्षण आहे. ‘काटय़ांचे गाव’ म्हणून ‘काटे िपपळे’ अशी गावची ओळख होती. कालांतराने िपपळे सौदागर हे नाव रूढ झाले. मूळचे काटे व त्यांचे कुटे, कुंजीर, जाचक, भिसे, झ्िंाजुर्डे, मुरकुटे असे पै-पाहुण्यांचे हे गाव आहे. गावात कायम भावकीचे, नात्यागोत्याचे राजकारण दिसून येते. संघर्ष येथे नवीन नाही. शंकर काटे विरुद्ध प्रधान कुंजीर या बहुचर्चित लढतीचा विषय असो, की सध्याचे काटे परिवारातील तीव्र हेवेदावे, कायम चर्चेचे विषय झाले आहेत. २००२ मध्ये काटय़ांच्या मतविभागणीमुळे रहाटणीचे चंद्रकांत नखाते निवडून आले.
सन २००७ शंकर काटे यांचे बंधू नाना काटे निवडून आले. जयनाथ काटे, शत्रुघ्न काटे, संदीप काटे, शेखर कुटे आदी परस्परांच्या विरोधात लढल्याचा फायदा नाना काटेंना झाला. २०१२ मध्ये महिला गटातून नाना यांच्या पत्नी शीतल तर, कुणबी दाखला मिळवलेले शत्रुघ्न काटे ओबीसीतून निवडून आले. दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. मात्र, त्यांच्यात समन्वय नव्हता. पाच वर्षांत नाना-शत्रुघ्न यांच्यातील शह-काटशहाने व श्रेयवादाने कळस गाठला, त्याचा अनेकांना फटका बसला. २०१७ च्या निवडणुकीतील चांगले आरक्षण पडल्याने चारही जागांवर काटे परिवाराचा डोळा आहे. मात्र, चित्र अद्याप स्पष्ट नाही. नगरसेवक शत्रुघ्न काटे पुन्हा ओबीसीतून तर नगरसेविका शीतल काटे महिला गटातून पुन्हा भवितव्य आजमावून पाहत आहेत. नाना काटे कोणत्या गटात लढणार, जयनाथ काटे यांच्याशी पुन्हा ‘सामना’ होणार का, याची उत्सुकता आहे. प्रत्येक गटात ताकजीचे कार्यकर्ते इच्छुक आहेत. भाजपमध्ये उमेदवारीसाठी जास्त गर्दी आहे. महिलांच्या गटात नात्यागोत्यातील महिलांमध्येच चुरस आहे. रहाटणीचा भाग जोडला असल्याने येथील नखाते व कोकणे परिवाराची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.