पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या पवना नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी मैलामिश्रित पाणी सोडले जाते. पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी या भागांमध्ये पवना नदीत मैलामिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आजूबाजूच्या रहिवाशांकडून केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. शहरातून वाहणाऱ्या नदीपात्राचे अंतर २४.४० किलोमीटर आहे. पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर, भालेकरनगर येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या भागात सांडपाणी वाहिन्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, सांडपाणी वाहिन्यांमधून गळती होत असून, वाहिन्यांच्या झाकणावरून ओसंडून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे हे मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात मिसळून पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे. चिखली, जाधववाडीतील जाधव कमानीपासून गेलेल्या नैसर्गिक नाल्यामध्ये सांडपाणी सोडल्याने परिसरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांसह बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्यांना दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या परिसरातून दररोज विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालक ये-जा करतात. दुर्गंधी आणि घाणीमुळे रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. पिंपळे गुरवच्या मुख्य चौकामध्ये तुळजाभवानी मंदिर असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. पाण्यातून येणारी दुर्गंधी आरोग्यास धोकादायक ठरत आहे.
सांडपाणी थेट नदीत मिसळल्याने नदीच्या पाण्याची गुणवत्ता घसरली असून, परिसरात डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि प्रदूषण वाढले आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी वाहिन्यांतील पाणी सोडू नका, अशी मागणी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने केली जात आहे.
रहिवाशांच्या मागण्या
– पंपिंग स्टेशनमधील गाळाची तातडीने सफाई करावी.
– सांडपाण्याच्या वाहिन्यांमधील गळती दुरुस्त करावी.
– पवना नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करावेत.
– नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवावी.
महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. सांडपाणी वाहिनीतील पाणी नाल्यात सोडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप जाधववाडी येथील विजय डोके यांनी केला.
पिंपळे गुरवमध्ये सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळून पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे. रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपळे गुरव येथील नितीन कोरे यांनी केली.
विद्युत विभागाच्या अभियंत्यांना स्थळपाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतील. सांडपाणी नदीपात्रात जाते, हे चुकीचे आहे. सांडपाणी वाहिनी, झाकणांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी जलनिस्सारण विभागाकडे असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे सह शहर अभियंता अनिल भालसाकळे यांनी सांगितले. पंपिंग यंत्रणा बंद पडल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास, तसेच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास सांडपाणी झाकणांमधून बाहेर येण्याची शक्यता असते. पंप स्टेशनवरील संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ यांनी सांगितले.
