इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या क्षेत्रात गेल्या पंचवीस-तीस वर्षांत डाळिंब पिकाने ठसा उमटवला होता. परदेशात निर्यात होणारे हे फळ शेतकऱ्यांच्या आशेचा किरण ठरले होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी डाळिंबावर तेल्या रोगाने झडप घातली आणि शेतकऱ्यांची पायाभरणीच डळमळीत झाली. फळांची साल काळवंडून उत्पादन विक्रीयोग्य राहत नसे, झाडे कमकुवत होऊ लागली, तर बाजारात दर घसरले. परिणामी, अनेकांनी रोगट बागा उपटल्या, तर जुन्या बागा वयामुळे गळून पडल्या. या सर्वांमुळे तालुक्यातील डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने घटले.

या काळोख्या चित्रातून बाहेर पडताना कृषी विभाग व प्रगत शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केले. शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध लागवड तंत्र आत्मसात केले. ठिबक सिंचन, खतांचा संतुलित वापर, रोगनियंत्रणासाठी योग्य फवारण्या, याबरोबरच सेंद्रिय पद्धतींचा समावेश यामुळे नव्या बागा अधिक सक्षम बनल्या. ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाला व्यापारी व ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नव्या बागा लावण्याचे धाडस दाखवले.
या बदलत्या सकारात्मक परिस्थितीचे थेट दर्शन नुकत्याच झालेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावात दिसले. उच्च प्रतीचे डाळिंब प्रतिकिलो तब्बल पाचशे रुपये दराने विकले गेले. एवढा चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये, तसेच परदेशातही इंदापूरमधील डाळिंबाला पसंती मिळते आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांची डाळिंब खरेदीसाठी पुन्हा या भागाकडे ओढ वाढू लागली आहे.

डाळिंबाचे हे नवचैतन्य फक्त इंदापूरपुरते मर्यादित नाही. शेजारील माढा व माळशिरस तालुक्यांतही शेतकऱ्यांचा कल झपाट्याने डाळिंब लागवडीकडे वळला आहे. या भागातील मातीची रचना, हवामान आणि पाण्याची उपलब्धता डाळिंबासाठी अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी याचा योग्य फायदा घेतला आहे. परिणामी, बाजार समित्यांच्या आवारात डाळिंबाची सातत्याने आवक होत असून, लिलावात गजबज वाढली आहे. तेल्या रोगाच्या संकटामुळे एके काळी डोळ्यांत पाणी आलेल्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आता पुन्हा परतला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर, रोगांवर नियंत्रण आणि बाजारात मिळणारे समाधानकारक दर या तिहेरी घटकांमुळे शेतकरी अधिक आत्मविश्वासाने पुढे सरकत आहेत. ‘कधी काळी रोगाने बागा उद्ध्वस्त केल्या होत्या. पण, आता पुन्हा आशेचा किरण दिसतो आहे,’ अशी प्रतिक्रिया तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून मिळते आहे.

इंदापूर, माढा, माळशिरस या भागांत डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. रोगराईच्या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी नव्या बागांची उभारणी केली आहे. बाजारपेठेत मिळणारे चांगले भाव, परदेशात कायम असलेली मागणी आणि सुधारित उत्पादनपद्धतींमुळे डाळिंबाचे भवितव्य पुन्हा उजळ दिसत आहे. डाळिंबाच्या या पुनरुज्जीवनामुळे तालुक्याच्या शेतीला नवा उभारीचा श्वास मिळाल्याचे चित्र आहे. म्हणूनच शेतकरी इंदापूरसह शेजारील भागांत पुन्हा एकदा डाळिंबाच्या लागवडी व जोपासना शास्त्रशुद्ध पद्धतीने करू लागले आहेत.

इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडतदार राजाभाऊ गवळी सांगतात, ‘आधी जुन्या बागा व तेल्या रोगग्रस्त बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्याने डाळिंबाची आवक मंदावली होती. मात्र, आता शेतकरी पुन्हा नव्याने डाळिंबाच्या पिकाकडे सुधारित तंत्राने वळला आहे. आता बागेच्या संगोपनाबरोबरच डाळिंबाचे झाड आच्छादनाने झाकले जात असल्याने दर्जेदार डाळिंब बाजारात येत असून, दरही चांगला मिळत आहे.