लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अनवधानाने पिशवीत काडतुसे राहिल्याने एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यास विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. काडतुसे बाळगणे म्हणजे गुन्ह्याची तयारी किंवा उद्देश होत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाने केला. त्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची २० हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

रवीकुमार पांडुरंग झावरे (वय ३६, रा. राहुरी) असे जामीन मंजूर केलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सध्या टपाल विभागात कार्यरत आहेत. झावरे एक एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आले होते. ते पुणे ते गुवाहाटी- दिल्ली या विमानातून प्रवासासाठी निघाले होते. लोहगाव विमानतळावर तपासणीमध्ये त्यांच्याकडील पिशवीत दोन जिवंत काडतुसे आढळून आली होती. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात झावरे यांना अटक करण्यात आली होती. झावरे यांच्या वतीने ॲड. ऋषिकेश सुभेदार आणि ॲड. अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

आणखी वाचा- पुणे: लोहमार्ग पोलिसांकडूनच रेल्वे स्थानकावर गैरप्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झावरे लष्करातून निवृत्त झाले आहेत. लष्करी सेवेत असताना दोन जिवंत काडतुसे अनावधानाने त्यांच्याकडे राहिली होती. काडतुसे त्यांच्या पिशवीत असल्याची माहिती त्यांना नव्हती. काडतुसे बाळगणे म्हणजे गुन्हा करण्याचा उद्देश नसतो, असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील ॲड. सुभेदार आणि ॲड. डांगे यांनी केला. न्यायालायने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन त्यांचा जामीन मंजूर केला.