पुणे : बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंध घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी टपाल विभागाने वैशिष्ट्यपूर्ण राखी पाकीट तयार केले असून त्याद्वारे भावापर्यंत वेळेत राखी पोहोचविणे शक्य होणार आहे.हे वैशिष्ट्यपूर्ण पाकीट वॉटरप्रूफ कागदापासून बनवण्यात आले आहे. देशात आणि परदेशात असलेल्या भावाला ‘स्पीड पोस्ट’ने बहीण राखी पाठवू शकते. टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राने केलेली ही योजना पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आली आहे.
या विशेष पाकिटाद्वारे ‘स्पीड पोस्ट’ ने परदेशातही राख्या जलद आणि वेळेवर पोहोचतील. १२ रुपये किमतीच्या या पाकिटावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे त्याचे वर्गीकरण करणे सोपे जाते. शिवाय वेळेत राख्या पोहोचवण्यासाठी मोठ्या टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत आणि राखी पाकीट वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये सूचना देखील देण्यात आल्या आहेत, असे पुणे क्षेत्राचे टपाल सेवा संचालक अभिजित बनसोडे यांनी सांगितले.
विशेष टपाल पाकिटाद्वारे पाठविण्यात आलेल्या राख्या
२०२०-२१ मध्ये ३५ हजार
२०२१-२२ मध्ये ५० हजार
२०२२-२३ मध्ये ७४ हजार
२०२३-२४ मध्ये ७० हजार
२०२३-२४ मध्ये ८७ हजार
नागरिकांनी प्रत्येक पाकिटावर प्राप्तकर्त्याचा आणि प्रेषकाचा पत्ता आणि पिन कोड व्यवस्थित लिहावा तसेच टपाल कार्यालयातील पिन कोड असलेल्या पेटीमध्ये हे राखी पाकीट द्यावे.अभिजित बनसोडे, संचालक, टपाल सेवा पुणे क्षेत्र