पिंपरी : मेट्रोचे काम सुरू असल्याने निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प ते चिंचवड स्टेशनपर्यंतच्या सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांचा रोष वाढल्यानंतर महामेट्रोने सेवा रस्ता पक्का करून देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, पक्का रस्ता करण्यासाठी काही दिवस या मार्गावरील वाहतूक बंद करून इतरत्र वळविण्याची मागणी महामेट्रोने महापालिका व वाहतूक पोलिसांकडे केली आहे. वाहतूक वळवून रस्ता मोकळा करून देताच पक्का रस्ता तयार केला जाईल, असे पुणे महामेट्रो प्रशासनाने सांगितले.
पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारित मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेटपर्यंतचा सेवा रस्ता आणि बीआरटी मार्ग महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरित केला आहे. हे अंतर ४.५ किलोमीटर इतके आहे. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. सध्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता, बीआरटी मार्ग खोदून खांबाची उभारणी, ‘व्हायाडक्ट’चे काम सुरू आहे. विनाअडथळा काम करता यावे, यासाठी महामेट्रोने या मार्गावर सुरक्षा कठडे (बॅरिकेड) लावले आहेत. त्यामुळे सेवा रस्ता प्रचंड अरुंद झाला आहे. पदपथ उखडून तेथे रस्ता करण्यात आला आहे.
अरुंद रस्ता, त्यात वाहनांची मोठी वर्दळ आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागतात. दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागतो. खड्ड्यांबाबत सामाजिक संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांनी वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. खड्डेदुरुस्तीबाबत महापालिकेने महामेट्रोला तीन वेळा पत्र पाठविले. मात्र, महामेट्रोकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने खड्डेमय रस्त्यांवरूनच वाहतूक सुरू आहे. आता, या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद केल्यास रस्ते पक्के करून देऊ, असा प्रस्ताव महामेट्रोने दिला आहे.
निगडी ते चिंचवड स्टेशन मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्ते दुरुस्त केल्यानंतरही पावसामुळे वारंवार खड्डे पडत आहेत. या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने वळवून काही दिवस बंद करावी. त्यानंतर हा रस्ता पक्का केला जाईल.श्रावण हर्डीकर,व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
महामेट्रो व्यवस्थापनाने रस्तेदुरुस्तीचा कालावधी कळवावा. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधावा. निगडी ते चिंचवड स्टेशन मार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण सहकार्य करील.बापूसाहेब गायकवाड,सहशहर अभियंता, दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका