पुणे : एप्रिल आणि मे महिन्याच्या देयकांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची रक्कम भरण्यासाठी वीजग्राहकांना दोन स्वतंत्र देयके देण्यात येत आहेत. अनामत रकमेतील फरकाची थकबाकी सुमारे ३९० कोटी रुपये असून, पुणे विभागातील १४ लाख घरगुती ग्राहकांना स्वतंत्र देयके देण्यात आली आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. मासिक देयक असेल, तर सरासरी देयकाच्या दुप्पट आणि त्रैमासिक देयक असेल, तर सरासरी त्रैमासिक देयकाच्या दीडपट सुरक्षा ठेव घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेवीवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम देयकांद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना दिली जाते.

वीजग्राहकांना एप्रिल आणि मे महिन्याच्या देयकांसह सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे विभागात आतापर्यंत १४ लाख ३९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ३९० कोटी ३८ लाख रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची स्वतंत्र देयक देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

वीजग्राहकाचे वार्षिक सरासरी देयक ५०० रुपये असल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे एक हजार रुपयांची सुरक्षा ठेव असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात सुरक्षा ठेवीचे ८५० रुपये जमा असल्यास संबंधित ग्राहकास १५० रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र देयक देण्यात येत आहे. तसेच, जमा असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम वीजदेयकात दरमहा नमूद करण्यात येत आहे. – निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण