पुणे : धनकवडी भागातील तीन हत्ती चौकात विजेचा खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. विजेचा खांब कोसळल्यानंतर धनकवडीतील चव्हाणनगर ते तीन हत्ती चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला.
धनकवडीतील तीन हत्ती चौकात रविवारी रात्री आठच्या सुमारास विजेचा खांब रस्त्यात कोसळला. खांब एका रिक्षावर पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. सुदैवाने रिक्षात कोणी नव्हते. त्यामुळे गंभीर घटना टळली. विजेचा खांब कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागातील वीजपुरवठा तातडीने खंडीत करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा रस्त्यावर पडलेला खांब बाजूला काढण्यात आल्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. खांब पडल्यानंतर या भागातील २५० घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.