लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : अभिजात संगीताच्या परंपरेची मूल्ये बुजुर्ग कलाकारांनी जपणूक करत बदलातून रुजवली आहेत. युवा पिढीच्या कलाकारांनी चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणासाठी मानसिकता तयार करून घेणे आवश्यक आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी अनेक वर्षांच्या साधनेतून रागप्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त संगीत सादरीकरणाची भूमिका मांडली. राग-समयसिद्धान्ताविषयीचे त्यांचे विचार पुढील पिढीतील कलाकारांना उपकारक ठरतील, असे मत तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.

डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनतर्फे आयोजित ‘रागप्रभा संगीतोत्सवा’मध्ये ‘रागप्रभा विचारसंचित’ या पुस्तिकेचे प्रकाशन पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संतूरवादक ताकाहिरो अराई, प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी, फाउंडेशनचे सल्लागार अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे या वेळी उपस्थित होते.

तळवलकर म्हणाले, ‘प्रभाताईंच्या विचारांमागे साधनेची ताकद आणि मूल्ये आहेत. हे विचार परंपरा मोडावी म्हणून नव्हे, तर सादरीकरणात मुभा असावी म्हणून पुढे आले आहेत. मैफलीच्या वेळा ठरावीकच असल्याने राग प्रहराची ही चौकट मोडली जाणे आवश्यक आहे. राग-तालांच्या प्रकृतीशी साधर्म्य साधणारे रागसंगीत सादर व्हावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात ताकाहिरो अराई यांच्या संतूरवादनातून ‘बसंत मुखारी’, श्रीनिवास जोशी यांच्या गायनातून ‘तोडी’, पं. विनायक तोरवी यांच्या गायनातून ‘अहिर भैरव’ आणि डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या गायनातून ‘ललत’ रागाची वैशिष्ट्ये उलगडली. ‘हिंडोल’ आणि ‘हिंडोल बहार’ राग गायनातून पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्ध गायनाने महोत्सवाची सांगता झाली.