पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकर याच्याकडून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सहा मोबाइल संच जप्त केले असून, त्याने त्यातील विदा (डाटा) नष्ट केला असल्याचे ‘एटीएस’च्या तपासात निदर्शनास आले आहे. कुरुलकर याच्या आवाजाच्या चाचणीवर (व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस) ९ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्याने त्याच्या वकिलामार्फत जामीन मिळवण्यासाठी बुधवारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला.
कुरुलकर याच्याकडील सहा मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे. त्यापैकी एक मोबाइल संच राजस्थानातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचा आहे. एक मोबाइल संच दुरुस्त करायचा आहे. त्याने मोबाइलमधील विदा नष्ट केला आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा >>>मेट्रोला पुणेकरांची पसंती! विस्तारित सेवेला पहिल्या दोन दिवसांत मोठा प्रतिसाद
कुरुलकर याने त्याचे वकील ॲड. ऋषिकेश गानू यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कुरुलकरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याची डीआरडीओच्या समितीकडून चौकशी करण्यात आली होती. त्याने शत्रुराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एटीएसने त्याच्याकडून इलेक्ट्राॅनिक साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती ॲड. गानू यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाद्वारे केली आहे.
हेही वाचा >>>टेस्ला पुण्यात! भारतातील पहिले कार्यालय विमाननगरमध्ये
कुरुलकरच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर याची व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणी करण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले, असे ॲड. गानू यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही. व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणीस परवानगी मिळाल्यास तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळेल, असे ॲड. फरगडे यांनी न्यायालयात सादर केलेल्या लेखी युक्तिवादात म्हटले आहे. व्हाॅईस लेअर सायकाेलाॅजिकल ॲनलिसिस चाचणी तसेच कुरुलकरच्या जामीन अर्जावर ९ ऑगस्ट रोजी सुनावणी हाेणार आहे.
कुरुलकरचे तपासात असहकार्य
कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकील ॲड. विजय फरगडे यांनी न्यायालयात नमूद केले. कुरुलकर याने मोबाइल संचातील काही विदा (डाटा) नष्ट केला आहे. तो परत मिळवायचा आहे. कुरुलकर बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी व्हाॅईस लेअर सायकोलाॅजिकल ॲनलिसिस चाचणी करायची आहे. त्यासाठी कुरुलकरच्या सहमतीची गरज नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.