पिंपरी : अत्याचारप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. फौजदार नीलिमा जाधव तपास करीत आहेत.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे, असे बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.