छायाचित्रे व्हायरल होण्याची राजकारण्यांना भीती
पुणे : ‘राजकारण्यांना छायाचित्रे ‘मेक’ करू शकतात किंवा ‘ब्रेक’ करू शकतात. त्यामुळे राजकारण्यांना छायाचित्रांमधून काय दिसेल, याची भीती असते. विशेषत: निवडणुकीच्या काळात ती अधिकच वाढते,’ असे मत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरूवारी व्यक्त केली. ‘समाजमाध्यमांवर ती संवेदनशीलता दिसत नाही. त्यामुळे सध्या कोणती छायचित्रे कधी व्हायरल होतील, हे सांगता येत नाही,’ अशी टिपण्णीही त्यांनी केली.
‘पुणे फेस्टीवल’मध्ये पुणे श्रमिक संघाच्या सहकार्याने आयोजित छायाचित्र पत्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी शिंदे बोलत होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाल्या,‘इतिहास समोर आणताना छायाचित्र पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. नेमके काय टिपायचे, याची जबाबदारी त्यांच्यावर असते. इतिहास चुकीच्या पद्धतीने समोर न येण्यात छायाचित्रकारांची भूमिका महत्वाची असते. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास छायाचित्रांनी समोर आणला. तत्कालीन छायाचित्रे पाहिल्यानंतर कोणी त्यात सहभाग घेतला आणि कोणी नाही, हे सहज समजते.’
‘छायाचित्रे बोलकी असतात. कित्येकदा त्यांना ओळींची गरजही नसते. पाहिल्याबरोबर लगेचच ती समजतात. नेमके काय टिपायचे, याची मोठी जबाबदारी छायाचित्र पत्रकारांवर असते. छायाचित्रांमध्ये काही लपून राहत नाही. कित्येकदा छायाचित्र पाहिल्यावर अंगावर काटा येतो. इतकी संवेदनशीलता त्यात असते.
आता मात्र असे अंगावर काटा आणणारी छायाचित्रे कमी झाली आहेत,’ अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. ‘न्यायमूर्ती रानडे यांनी हा उत्सव सुरू करताना टिळकांना पत्र लिहून भविष्यात या उत्सवाचे स्वरूप कसे, असेल याबाबत चिंता व्यक्त केली होती. आता तीच चिंता आपण रोज खरी करतो आहोत,’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. ‘पूर्वी नेत्यांना छायाचित्रांचे फारसे महत्व नसायचे. आता मात्र राजकारणात छायाचित्रांचे महत्त्व वाढले आहे. फोटो फ्रेममधून आपण बाहेर येतो की काय, याची भीती राजकारण्यांना वाटताना दिसते.’ असेही ते म्हणाले.