पुणे : खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांनी त्यांच्या वकिलांमार्फत बुधवारी न्यायालयात जामिन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात एका हाॅटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गांजा, कोकेनसदृश अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय ४१), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२), श्रीपाद मोहन यादव (वय २७) यांच्यासह दोन तरुणींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील सात आरोपी हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. डाॅ. खेवलकर यांनी यापूर्वी खराडीतील हाॅटेलमध्ये पार्टी आयोाजित केल्याची माहिती तपासात मिळाली होती.
येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डाॅ. खेवलकर यांनी त्यांचे वकील पुष्कर दुर्गे आणि ऋषीकेश गानू यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. डाॅ. खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून मत मांडण्यात येणार आहे. डाॅ. खेवलकर यांच्याविरुद्ध एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. डाॅ. खेवलकर यांनी खराडीतील हाॅटेलमध्ये यापूर्वी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तरुणींना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली होती. त्यानुसार राज्य महिला आयेगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना नुकतेच दिले. याबाबत महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना पत्र देण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी डाॅ. खेवलकर यांचा दुसरा मोबाइल संच, कॅमेरा, लॅपटाॅप जप्त केला आहे, तसेच संबधित हाॅटेलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चित्रीकरण साठविणारे यंत्र (डीव्हीआर) ताब्यात घेतला आहे. उर्वरित सहा आरोपींचे मोबाइल आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. खराडीतील पार्टीत गांजा, कोकेन सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले अमली पदार्थ विश्लेषणासाटी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अमली पदार्थ पुरविणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.