इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये आज विक्रीसाठी आलेल्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला लिलावात विक्रमी ४५१ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळाला. दोन नंबर प्रतीच्या डाळिंबाला ४०० रुपये, तर तीन नंबर प्रतीच्या डाळिंबाला ३५० रुपये प्रति किलो भाव मिळाला. डाळिंबाचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेली काही वर्षे डाळिंबाच्या पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने इंदापूर तालुक्यातील बहुतांश डाळिंब उत्पादकांनी आपल्या बागा काढून टाकल्या आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून इंदापूर तालुक्यामध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यात आली होती. डाळिंबाचे वाढते क्षेत्र पाहून तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात डाळिंब मार्केट सुरू केले.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर डाळींब मार्केटचा मोठा दबदबा निर्माण झाला होता. डाळिंबाची इंदापूरला मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत होती. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल इंदापूरच्या बाजारपेठेत होत असल्याने इंदापूर बाजारपेठेला नवचैतन्य आले होते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांमध्ये डाळिंबाच्या बागेवर मोठ्या प्रमाणात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादन घेणे मोठे जिकिरीचे झाले. डाळिंबाच्या बागेत पिकासाठी झालेला खर्चही वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतातील डाळिंबाच्या बागा काढल्या होत्या.
आता सध्या डाळिंबाच्या लागवडी पुन्हा नव्या जोमाने शेतकरी करत असला, तरी डाळिंबाचा मोठा तुटवडा बाजारपेठेमध्ये निर्माण झाला असून, इंदापूरच्या डाळींब मार्केटमध्ये डाळिंबाची होणारी आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातूनच डाळिंबाला असलेली मागणी आणि वाढते खरेदीदार यामुळे डाळिंबाचे बाजारभाव सातत्याने वाढतच आहेत. इंदापूर बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावामध्ये डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला. हा दर अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याची माहिती आडतदार राजाभाऊ गवळी यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये होती. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या डाळिंबाची खरेदी काही व्यापारी थेट बागेतूनच करीत असतात. आता चांगला दर मिळत असल्याने इंदापूरच्या मार्केटमध्ये डाळिंबाची आवक चांगल्या प्रकारे वाढू लागली आहे. यापुढेही आवक वाढेल. – तुषार जाधव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर.