चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवीत होमहवन करण्याच्या बहाण्याने घरी गेलेल्या भोंदू बाबाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या ६५ वर्षीय भोंदू बाबाने ऑगस्ट २०१३ ते १७ जून २०१५ या कालावधीत पीडित महिलेची विचित्र अवस्थेत काढलेली छायाचित्रे लोकांना दाखविण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
अशोक नारायण घाटगे (वय ६५, रा. महर्षिनगर) असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याच्याविरोधात ३२ वर्षीय विवाहित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा उच्चाटन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला कोंढवा परिसरात राहण्यास असून ती लष्करमधील एका दुकानात काम करीत होती. ती नोकरी करीत असलेले दुकान तोटय़ात जात होते. त्यामुळे नोकरी जाईल आणि कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहील या भीतीने ती चिंताग्रस्त होती. दरम्यान, ऑगस्ट २०१३ मध्ये पीडित महिलेच्या दुकानासमोर घाटगे आला. महिलेने त्याला आपली चिंता सांगितली. आरोपीने या महिलेच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेण्याचे ठरविले. माझ्याकडे चमत्कारी शक्ती आहे. मी कोणताही आत्मा बोलावून घेऊ शकतो. होमहवन केल्यास तुम्ही काम करीत असलेले दुकान व्यवस्थित चालेल आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागेल, असे आमिष त्याने दाखविले. त्याला भुलून महिला होमहवन करण्यास तयार झाली. होमहवन करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या आरोपीने घरात महिलेशिवाय कोणी नाही याची खात्री करून घेतली. प्रसादामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विचित्र अवस्थेतील छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे लोकांना दाखवू अशी भीती घालून त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे या महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा भोंदू बाबा तांत्रिक विद्या येत असल्याचे सांगून गेल्या अनेक वर्षांपासून होमहवन करीत असल्याची माहिती तपासामध्ये मिळाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अन्य माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2015 रोजी प्रकाशित
नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने लैंगिक शोषण
ती नोकरी करीत असलेले दुकान तोटय़ात जात होते. त्यामुळे नोकरी जाईल आणि कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहील या भीतीने...

First published on: 21-11-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pretext job sexual exploitation crime police