नवरात्रोत्सवासाठी फूल बाजार बहरला आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात फुलांच्या मागणीत वाढ होते. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात फुलांची आवक वाढली आहे.

नवरात्रोत्सवात फुलांना मागणी

रविवारपासून (२५ सप्टेंबर) पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फुले विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली. पितृपंधरवड्यात फुलांना मागणी नव्हती. हार विक्रेत्यांनी रविवारी फुलांची खरेदी केली. नवरात्रोत्सवात फुलांना मागणी राहणार आहे. दसऱ्याच्या आधी दोन दिवस झेंडूची आवक सुरू होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची लागवड चांगली झाली, असे मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे शहरात डेंग्यूचा ‘डंख’; जुलै ते सप्टेंबर महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली

पावसाचा फुलांना फटका

पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. मध्यंतरी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फुलांना बसला आहे. चांगल्या प्रतीच्या सुक्या फुलांना मागणी वाढली असून सुक्या फुलांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढले. पावसामुळे फुले खराब झाली आहे. पावसाने उघडीप दिली असती तर फुलांचे दर कमी झाले असते. फुलांची आवक चांगली होत आहे. नवरात्रोत्सवात झेंडू, शेवंती, गुलछडी, अष्टर, बिजली या फुलांच्या मागणीत वाढ होते, असे भोसले यांनी नमूद केले.


मंडईत फुले खरेदीसाठी गर्दी

मंडई परिसरातील हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक, रामेश्वर चौक परिसरात फूल विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी सोमवारी सकाळी मंडई परिसरात गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवात तिळाच्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. तिळाच्या फुलांना मागणी चांगली आहे.

हेही वाचा- सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये भारतीय केंद्राची स्थापना


फुलांचे प्रतवारीनुसार किलोचे दर

झेंडू- १० ते ८० रुपये

शेवंती- ७० ते २०० रुपये

गुलछडी- २५० ते ५०० रुपये

अष्टर- १०० ते २०० रुपये किलो

बिजली- ५० ते १५० रुपये