scorecardresearch

चारित्र्य प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांच्या संख्येत दहा हजारांनी वाढ

खासगी, शासकीय नोकरी मिळवताना सर्वात पहिल्यांदा चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीची मागणी केली जाते

(प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रकरणांच्या निपटाऱ्यास पुणे पोलिसांकडून प्राधान्य

पुणे : खासगी तसेच शासकीय नोकरी मिळवणे तसेच परदेशात जाणाऱ्या नागरिकांना चारित्र्य पडताळणी (कॅरेक्टर व्हेरीफेकेशन) बंधनकारक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांच्या निपटाऱ्यास पुणे पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत असून गेल्या वर्षी प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांच्या संख्येत दहा हजारांनी वाढ झाली आहे.

खासगी, शासकीय नोकरी मिळवताना सर्वात पहिल्यांदा चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीची मागणी केली जाते. हे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय नोकरी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. पुणे शहरात मोठय़ा संख्येने माहिती तंत्रज्ञान कंपन्या आहेत. माहिती तंत्रज्ञान तसेच खासगी कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी गृहविभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. ओळखपत्र, जन्मदाखला, संबंधित कंपनी किंवा शासकीय विभागाचे पत्र संकेतस्थळावर अपलोड करावे लागते. रिक्षा परमिट मिळवण्यासाठी प्रमाणपत्र मिळवावे लागते. प्रमाणपत्र मिळवणाऱ्या नागरिकाने अर्ज सादर केल्यानंतर पुणे पोलिसांच्या चारित्र्य पडताळणी विभागात अर्ज येतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत का? याबाबतची पडताळणी केली जाते. गुन्हा दाखल नसल्यास त्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येते. शासकीय नोकरीसाठी संबंधित विभागाकडून पोलीस आयुक्तांच्या नावे पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानंतर पोलिसांकडून शासकीय नोकरीची पडताळणी पूर्ण केली जाते.

चारित्र्य पडताळणीसाठी आलेल्या प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर पोलीस ठाण्यांकडून पाच दिवसांत पडताळणी केली जाते. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर महिनाअखेरीपर्यंत चारित्र्य पडताळणी विभागाकडे ३४ हजार ५०० अर्ज सादर झाले होते.  खासगी कंपनीत नोकरीसाठी ३१ हजार नागरिकांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवले आहे.

एक ते दोन आठवडय़ांच्या आत पडताळणी

शासकीय नोकरी, खासगी नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज आल्यानंतर ३० दिवसांच्या मुदतीत प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे.परदेशात जाणाऱ्यांसाठी २१ दिवसांची मुदत आहे. परदेशात नोकरी, व्हिस्सा, शिक्ष

णासाठी  चारित्र्य प्रमाणपत्र  मिळवावे लागते. पडताळणीस विलंब न लावता एक ते दोन आठवडय़ांच्या आत नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नारवाड आणि सहकारी काम पाहत आहेत.

चारित्र्य प्रमाणपत्र 

प्राप्त               अर्ज                  निपटारा

शासकीय नोकरी       २ हजार ७९६    २ हजार ७९०

खासगी नोकरी          ३१ हजार ३६९   ३१ हजार ७२ 

परदेशी वास्तव्य        ३९१          ३९१

 (आकडेवारी जानेवारी ते डिसेंबर २०२१ )

शासकीय तसेच खासगी कंपनीत नोकरीसाठी पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र मिळवावे लागते. परदेशात जाणाऱ्या नागरिकांना तर आठवडय़ाच्या आत प्रमाणपत्र दिले जाते. अर्जाच्या निपटाऱ्यास प्राधान्य देण्यात येत आहे. २०२० च्या तुलनेत जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांच्या  संख्येत दहा हजारांनी वाढ झाली आहे. 

संजय नारवाड, पोलीस निरीक्षक, चारित्र्य पडताळणी विभाग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priority for character certificates given by pune police zws

ताज्या बातम्या