पुणे : मलेरिया व डेंग्यू या रोगांच्या उच्चाटनाला यापुढील काळात सरकारच्या आरोग्य कार्यक्रमात अग्रक्रम देण्यात येईल, असे सूतोवाच केंद्रीय आरोग्य व विज्ञान- तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी येथे केले. मांजरी येथे सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या नवीन लस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सायरस पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षवर्धन यांनी सांगितले,की सिरमसारख्या संस्थांच्या मदतीने देशातील लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यास सरकारला मदत होणार आहे. दिल्ली राज्याचा आरोग्यमंत्री असताना काही बालरोगतज्ज्ञांनी  दिल्लीतील पोलिओच्या समस्येकडे आपले लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिओ निर्मूलन मोहीम तेथे यशस्वी केली व नंतर २०१४ मध्ये देशाचा आरोग्यमंत्री झाल्यानंतर तीच मोहीम देशपातळीवर यशस्वी करून दाखवली. यात अनेक आव्हाने असतानाही त्यावर पोलिओवर मात करण्यात यश आले.  देशात आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी गरिबांना फायद्याची असणारी आयुष्मान भारत योजना सरकारने यशस्वीपणे राबवली आहे. अलीकडेच केरळात पुन्हा निपा विषाणूचे रुग्ण सापडले होते, पण त्यावरही मात करण्यात यश आले.

कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. मलेरिया निर्मूलनाबाबत त्यांनी सांगितले, की आग्नेय आशियातील काही छोटे देशही यात यशस्वी झाले आहेत, त्यामुळे भारतातही ते उद्दिष्ट साध्य करता येईल. इबोला व इतर रोगांची आव्हाने कायम असली तरी जिल्हावार पाहणी यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक सजग आहेत. केंद्राकडून लशींचा पुरवठा राज्यांना केला जात असतो. पण कुठे लशींची कमतरता निर्माण झाल्याचे प्रसंग घडले असतील तर ते अपवादात्मक आहेत. शेवटी, आरोग्य हा राज्यसूचीतील विषय असून त्याची अंमलबजावणी त्या पातळीवर योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर ‘लॅन्सेट’ने जम्मू काश्मीरमधील आरोग्य व इतर समस्यांवर संपादकीय लिहिले होते, त्या अनुषंगाने आता जम्मू काश्मीरमध्ये आरोग्य सुविधात मोठा फरक घडून येईल का, असे विचारले असता त्यांनी सांगितले,की जम्मू काश्मीरमध्ये येत्या पाच वर्षांत आरोग्यच नव्हे तर इतरही सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवला जाईल.

जगातील मोठा लस निर्मिती प्रकल्प

सिरमचा नवा प्रकल्प जगातील सर्वात मोठा लस निर्मिती प्रकल्प असून  तीन हजार कोटींची गुंतवणूक त्यात आहे. तसेच,  तीन हजार लोकांना पाच वर्षांत रोजगार उपलब्ध होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.  ते म्हणाले की,  दरवर्षी ०.५ अब्ज लशींच्या डोसेसची (मात्रा)  निर्मिती केली जाईल. दीडशेहून अधिक देशात लशींचा पुरवठा केला जाणार असून या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिरमचा वाटा १०-१५ टक्के वाढणार आहे. या प्रकल्पात नोव्हेंबर २०१९ पासून उत्पादन सुरू केले जाणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास कारण ठरणाऱ्या ह्य़ूमन पॅपिलोमा विषाणूवरील लस येथे तयार केली जाणार असून त्याशिवाय टीडीएपी, थर्मोस्टेबल रोटासिल (रोटाव्हायरसची तापमानानुकूल  लस),ट्रास्टुझुमाब (हेरसेप्टिन- स्तनाच्या कर्करोगाची लस)  व उत्सेकिनुमॅब (स्टेलेरा- सोरायसिस निगडित संधिवातावरील लस) या मोनोक्लोनल प्रतिपिंडाधारित लशीही तयार केल्या जातील.

डेंग्यूवर लशीच्या चाचण्या यशस्वी

सायरस पूनावाला यांनी सांगितले,की डेंग्यूवर मोनोक्लोनल प्रतिपिंडांच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून या लशीसाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. या लशीमुळे डेंग्यूची लक्षणे २४ ते ४८ तासात कमी होतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priority to eradication malaria and dengue dr harsh vardhan zws
First published on: 10-09-2019 at 01:58 IST