पुणे : वाघोली भागातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उघडकीस आणला. या प्रकरणी प्राध्यापकासह विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बीजगणिताच्या उत्तरपत्रिकांचे सहा बंडल, दोन लाख सहा हजार रुपये, उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची किल्ली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी प्रा. प्रतीक किसन सातव (वय ३७, रा. प्रेमकुंज सोसायटी, केसनंद, वाघोली) यांच्यासह आदित्य यशवंत खिलारे (वय २० मूळ रा. रांजणीवळती, ता. आंबेगाव, जि. पुणे, सध्या रा. वाघोली), अमोल अशोक नागरगोजे (वय १९, मूळ रा. रोहतवाडी, पाटोदा, सध्या रा. वाघोली), अनिकेत शिवाजी रोडे (वय २०, मूळ रा. नान्नज, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, सध्या रा. वाघोली) यांना अटक करण्यात आलेली आहे. याबाबत पोलीस शिपाई शेखर काटे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हे सोमवारी (२ जून) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील बीजगणिताची (मॅथेमॅटिक्स २) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांना मिळाली. प्रा. सातव यांनी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकला.
त्या वेळी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षातील आठ विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने उत्तरपत्रिका ठेवलेल्या कक्षाची किल्ली त्यांच्याकडून जप्त केली. विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेल्या उत्तरपत्रिकांची सहा बंडले, तसेच प्रा. सातव आणि साथीदारांकडून दोन लाख सहा हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रा. सातव यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२), ३१८ (२), ३१८ (४), ६१ (२) सह सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) विधेयक २०२४ चे कलम ४, ५, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, कानिफनाथ कारखेले, सकटे, डोंगरे, तांबेकर, काटे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांनी ही कामगिरी केली.
नापास होण्याची भीती; विद्यार्थ्यांना हेरले
मुख्य आरोपी प्रा. प्रतीक सातव आणि साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना बीजगणितात नापास होण्याची भीती वाटत होती, अशा विद्यार्थ्यांना हेरले. सातव आणि साथीदारांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते ५० हजार रुपये घेतले. अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा कक्षाची (कंट्रोल रूम) बनावट चावी तयार करवून घेतली. या चावीचा वापर करून बीजगणिताच्या उत्तरपत्रिकांचे सहा लाखबंद बंडल काढून घेतले. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका काढून घेतल्या. उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या. या प्रकरणात अटक केलेले आरोपी आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे हे अभियांत्रिकी शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. नागरगोजे आणि खिलारे अभियांत्रिकी महाविद्यालयात रात्रपाळीत रखवालदार म्हणून काम करतात, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.