पुणे शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज विचारात घेता शहराला वर्षांला १८.८९ टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली असून त्याचा आराखडा जलसंपदा विभागाने गुरुवारी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत सादर केला.
पुणे शहराला सध्या पाटबंधारे विभागाकडून साडेअकरा टीएमसी पाणी मिळते. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या, शहराची हद्दवाढ तसेच महापालिका हद्दीबाहेर ज्या गावांना पाणीपुरवठा करावा लागतो त्याचा विचार करता शहरासाठी वाढीव पाणी मिळणे आवश्यक झाले आहे. मात्र, त्याबाबत पाटबंधारे विभाग व महापालिका यांच्यात वाद आहेत. या वादामुळे वाढीव साठा अद्याप मंजूर झालेला नाही. मुंबईत गुरुवारी जलसंपदा विभागाने बोलावलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. पुण्यासाठी १८.८९ टीएमसी पाणी आवश्यक असल्याचा आराखडा या वेळी सादर करण्यात आला.
या पाणीमागणीचा विचार करता एकूण मागणीपैकी अडीच टीएमसी पाणी भामा आसखेड धरणातून उपलब्ध होणार आहे. साडेअकरा टीएमसी सध्या मिळत आहे. त्यामुळे आणखी चार टीएमसी पाणी आवश्यक आहे व ते खडकवासला येथून मिळावे, असे या बैठकीत महापालिकेतर्फे सांगण्यात आले. त्याचा आराखडा बैठकीत सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.