पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन इमारतीचे कामकाज सुरू झाले आहे. तात्पुरत्या स्वरुपात मंगळवार पेठेतील जुन्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या गगनचुंबी ‘अंतरिक्ष टाॅवर्स’ या इमारतीतून पोलीस आयुक्यालयाचे कामकाज सुरू करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. जागेच्या भाड्यावरून हा पेच निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणे पोलीस आयुक्तालयातील आधुनिक इमारतीचे बांधकाम सुरू झाले. पोलीस आयुक्तालयातील मुख्य इमारती वगळता आवारातील गुन्हे शाखेची कार्यालये पाडण्यात आली आहेत. नवीन इमारतीसाठी पाया खोदण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. इमारत बांधणीचे काम एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. दोन वर्षांत पोलीस आयुक्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे.
पोलिस आयुक्तालयाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात मंगळवार पेठेतील ‘अंतरिक्ष’ टॉवरमधून सुरू करण्याच्या प्रस्ताव विचाराधीन आहे. भाड्यावरून पेच निर्माण झाल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. संबंधित जागामालकाने ८४ रुपये प्रतिचौरस फूट दराने जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, सरकारी नियमानुसार कमाल ८० रुपये दर देणे शक्य होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.
नवीन जागेत पोलीस आयुक्यालयाचे स्थलांतर केल्यास दरमहा २० ते २५ लाख रुपये भाडे माेजावे लागणार आहे. कार्यालय सुरू करण्यापूर्वी तेथे पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, तसेच प्रशासकीय विभागातील कार्यालयांचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे. ‘अंतरिक्ष टाॅवर्स’ची जागा स्थलांतरासाठी योग्य आहे. मात्र, भाडेदरामुळे स्थलांतराचा प्रस्ताव रखडला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस भरतीवरूनही पेच
पुणे शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाणी पोलीस सुरू करण्याचा प्रस्ताव गृह विभागाने नुकताच मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा पुण्यात केली होती. पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन अतिरिक्त एक हजार पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया काही कारणास्तव रखडली. नवीन भरती प्रक्रियेतून अतिरिक्त मनुष्यबळ पुणे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाणी, तसेच शहराचा विस्तार विचारात घेता एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायला हवे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नमूद केले.