सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; नऊ जणांच्या विरोधात गुन्हा
विमाननगर भागात एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून मसाज सेंटरच्या मालकासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसेच आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी मसाज सेंटरमधील व्यवस्थापाक हिना अकबरअली सय्यद (वय ३०, रा. लोहगाव), ताजुल इस्लाम अब्दुल वाहीद (वय ३३, रा. विमाननगर), फारुख अहमद, बदुल अहमद (वय ३२, रा. विमाननगर) यांना अटक करण्यात आली. मसाज सेंटरचा मालक सुरेश बाबुलाल परदेशी (रा. ८३०, कसबा पेठ), संदीप शरदचंद्र सहस्त्रबुद्धे (रा. श्रीकृष्ण कॅालनी, काळेवाडी), अविनाश खिंवसरा (रा. ८३०, कसबा पेठ), मसाज सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देणारे मालक अविनाश भाऊसाहेब साकोरे, भाऊसाहेब साकोरे यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

विमाननगरमधील एका इमारतीत ॲटमॅास्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून आठ तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरच्या व्यवस्थापकांसह तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत रोकड तसेच अन्य साहित्य असा एक लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजश्री मोहिते, नीलम शिंदे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे आदींनी ही कारवाई केली.