पुणे : ‘एखाद्या व्यक्तीला आपण जेवढी मोठी समजतो तेवढी मोठी ती नसते, हे अनुभवातून लक्षात येते. त्याउलट काही लांब अंतरावरील लोकांचे चांगले गुण पुढे येतात. संघाचा असलो, तरी मी संघर्षवृत्तीचा आहे. राजकारणात खरे आणि स्पष्ट बोललेले चालत नाही. मात्र, नेत्यांनी सकारात्मक राहून सत्य बोललेच पाहिजे,’ असे केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले. ‘सत्कार हा व्यक्तीच्या कार्याचा होत असतो. त्यासाठी तो पात्र असावा लागतो. लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी मी पात्र नाही. मात्र, लोकमान्यांच्या विचारांनुसार कायम काम करत राहीन,’ असेही त्यांनी नमूद केले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार’ नितीन गडकरी यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक, विश्वस्त आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डाॅ. गिताली टिळक आणि डाॅ. प्रणिती टिळक या वेळी उपस्थित होते. ‘लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद आणि संकोच दोन्ही आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यामुळे माझे मोठेपण वाढले आहे,’ अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘या देशात पैशाला तोटा नाही. पैसा खर्च होत नाही, ही समस्या आहे. मात्र, इमानदारीने काम करणाऱ्यांची कमतरता आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्रात अव्वल क्रमांकावर राहण्याची देशाची क्षमता आहे. त्यासाठी हिंमतीने लढत राहिलो, तर काहीही कठीण नाही. पण, लढत असताना सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा विचार करावा लागेल. देश विश्वगुरू होण्याची क्षमता बाळगून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प पूर्ण करण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्राला जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आणण्याचे स्वप्न आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गडकरी हे नेते नाहीत, तर संशोधक आहेत. प्रत्येक क्षेत्राची त्यांना माहिती आहे. नवीन प्रयोग त्यांना आवडतात. ते कधीही निराश होत नाहीत. पुणे-मुंबई दुतग्रती महामार्गाची कमी खर्चात आणि दोन वर्षांत उभारणी करून त्यांनी देशाचा आत्मविश्वास उंचावला. या मार्गाच्या उभारणीनंतरच पायाभूत सुविधांमध्ये गुणात्मक बदल सुरू झाले, तसेच आर्थिक परिवर्तनही शक्य झाले. राजकारणात असूनही स्पष्ट आणि थेट बोलण्याची त्यांची पद्धत लोकांना आवडते. ‘पोलिटिकली करेक्ट’ किंवा राजकीय सोयीचे ते बोलत नाहीत. त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची चिंताही ते करत नाहीत. ते वैदर्भीय आहेत, पण वैश्विक व्यक्तिमत्त्व आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य संकल्पनेतून राष्ट्रकारण सुरू केले. सत्ताकारणाचे रूपांतर समाजकारण आणि राष्ट्रकारणात झाले पाहिजे. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री